नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन

गिरीश मोहनराव थोरात यांनी स्वीकारला महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार

नागपूर: सिताबर्डी नागपूर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष गिरीश मोहनराव थोरात यांनी देखील आपल्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्र ग्रामीण बँक हि संपूर्ण शासकीय मालकीची बँक असून या बँकेचे भाग भांडवल हे भारत सरकार महाराष्ट्र राज्य सरकार व प्रायोजित बँक बँक ऑफ महाराष्ट्र यांचे आहे. वित्तीय सेवा विभाग भारत सरकारच्या निर्देशानुसार तत्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि तत्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकांचे एकत्रीकरण होऊन दि.१ मे २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकमेव ग्रामीण बँक म्हणून नवीन महाराष्ट्र ग्रामीण बैंक अस्तित्वात आली आहे. बँकेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असुन संपूर्ण राज्यात १३ विभागीय कार्यालये व तब्बल ७५९ शाखांमार्फत बँक संपूर्ण राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना वित्तीय सेवा पुरविण्याचे काम करीत आहे. याप्रसंगी बोलतांना केंद्रीयमंत्री गडकरी यांनी ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. ग्रामीण व अर्ध - शहरी भागातील नागरिक शेतकरी तसेच लघु उद्योजकांना सुलभ आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण बँकेसारख्या उपक्रमांची नितांत आवशक्यता असल्याचे त्यांनी याठिकाणी विशेष नमूद केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अत्याधुनिक सुविधा तसेच डिजिटल बँकिंगच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून बँकेच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र ग्रामीण बँक ही ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना बँकिंग सेवांचा लाभ देत आहे असे सांगतांनाच केंद्र सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या धोरणाचा उल्लेख करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची महत्त्वाची भूमिका असणार आहे असे देखील त्यांनी नमूद केले. यावेळी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी संवाद साधताना गडकरी यांनी कृषी पायाभूत सुविधांसाठी (Agri Infrastructure) बँकेने विशेष मदत करावी, तसेच शेतीमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीच्या वापरासाठी आवश्यक वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यावर देखील भर दिला. याप्रसंगी बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष थोरात यांनी देखील महाराष्ट्र ग्रामीण बँक ही शेती व शेती पूरक उद्योगासोबतच एमएसएमई उद्योग गृहकर्ज वाहन कर्ज आणि विविध कर्ज योजना तसेच आकर्षक बचत योजना व डिजिटल बँकिंग सुविधांच्या माध्यमातून सर्वच स्तरातील ग्राहकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन केले. ज्याप्रमाणे महाराष्ट्र हे देशातील एक अग्रेसर राज्य आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँक सुद्धा देशातील ग्रामीण बँका व बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य बैंक म्हणून नावारूपास येईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला आमदार श्रीकृष्ण खोपडे यांची देखील विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्य सरव्यवस्थापक मिलिंद घारड बँक ऑफ महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर चे विभागीय व्यवस्थापक राहुल वाघमारे तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे महाव्यवस्थापक श्रीराम भोर बँकेचे ग्राहक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी देखील मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. संचालन क्षेत्रीय कार्यालयाचे व्यवस्थापक गजानन सानप यांनी केले तर नागपूर क्षेत्रीय कार्यालयाचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक जितेंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून मानले.
क्षेत्रीय कार्यालयाचे व्यवस्थापक गजानन सानप यांनी केले तर नागपूर क्षेत्रीय कार्यालयाचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक जितेंद्र चव्हाण यांनी