नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

विभागीय आयुक्त कार्यालयात - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.15 ऑगाष्ट 2024 :- अनेकांच्या बलिदानातून, संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी अनेकांनी यातना सहन केल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या आजवरच्या वाटचालीत आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून एक मैलाचा टप्पा गाठला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारत हे ब्रीद घेऊन सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबध्दता ठेवली आहे. प्रगतीचे विविध टप्पे गाठतांना सामान्य माणसाच्या जीवनात परिर्वतन व्हावे यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आयुक्त कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरीक्त आयुक्त माधवी चवरे-खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील - भुजबळ, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस सहआयुक्त आश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाने केंद्र शासनासमवेत विविध उपक्रम, योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला. या प्रयत्नातून महाराष्ट्राची वाटचाल आता ट्रिलीयन डॉलरकडे झेपावली असून संबंध भारतात महाराष्ट्राने यात पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्याने साध्य केलेल्या प्रगतीची अनुभूती आपण सर्व घेत आहोत. हे विकासाचे पर्व आपण पाहात आहोत. येथील समृध्दी महामार्ग असेल, मेगा टेक्टाईल प्रोजेक्ट, मेट्रो आदींसह विविध सिंचन प्रकल्प महत्वाचे आहेत. सुमारे 88 हजार कोटीतून आपण वैनगंगा-नळगंगा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातून विदर्भातील दुष्काळ दूर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गत तीन वर्षात 5 हजार कोटींपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आणू शकलो याचे समाधान असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाने लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून चांगले निर्णय व उपक्रम हाती घेतले आहेत. लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रतिमहा दीड हजार रुपये आपण देत आहोत. कालपासून याचा प्रतिनिधीक सुरुवात केली आहे. येत्या 17 तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळेल. या एक कोटीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 5 लाख महिलांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही आपण सुरु केली आहे. सुमारे 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये असे विद्यावेतन आपण नोंदणीकृत युवकांना देत आहोत. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. मुलींसाठी 500 कोर्सेसच्या फिसची रक्कम शासन देत आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या घरावर सौर पॅनल बसविले त्यांना 300 युनीट मोफत वीज आपण देत आहोत. ज्यांची वीज 300 युनीटपेक्षा अधिक होत आहे. ती वीज आपले वीज महामंडळ विकत घेईल, असे त्यांनी सांगितले. सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना एक रुपया विमा अंतर्गत 278 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेयो, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथील विविध विकास कामांसाठी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या निधीतून विविध वैद्यकीय सुविधा आपण निर्माण करीत आहोत. केंद्र सरकारकडून मेट्रोसाठी 683 कोटी, नाग नदीसाठी 550 कोटी रुपयांचा निधी आपल्याला मिळाला आहे. जिल्ह्यातील 35 हजार 750 लोकांना आपण प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मान्यता दिली आहे. ओबीसींसाठी मोदी आवास योजनेत 6 हजार 747 घरांना मंजूरी देऊन यातील 1 हजार 54 घरे पूर्ण केली आहेत. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी घटक योजनांसाठी आपण 1 हजार 219 कोटी रुपयांच्या निधीची नागपूर जिल्ह्यासाठी तरतूद केली आहे. देशातील अद्ययावत असे क्रिडा संकुल आपण साकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासनाला भक्कम करण्यासाठी 272 कोटी रुपये खर्चून नवीन इमारत आपण उभी करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एक वृक्ष मातेच्या नावाने ही चळवळ आता अधिक प्रभावीपणे लोकसहभागातून राबविली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती पदक प्राप्त , विशेष सेवा पदक प्राप्त अधिकारी, अंमलदार, आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या दाखल्याचा त्वरीत निपटारा करणारे अधिकारी, अग्नीवीर सैन्य भरती मेळाव्यात उत्कृष्ट कार्य करणार व महाआवास योजना अभियान 2023-24 मध्ये योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांची आस्थेवाईक चौकशी केली.