नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

समर्पित भावनेने आयुर्वेदाचे अनुसरण करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पदवीचा आधार न घेता समर्पित आणि श्रद्धायुक्त भावनेने आयुर्वेदाचे अनुसरण करुन लोकांना दिलासा द्या असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला

नागपूर दिनांक १३ नोव्हेंबर :- आयुर्वेदाला आणिभारतीय उपचार पद्धतींना आता जगात मान्यता मिळत आहे. त्यासाठी केवळ पदवीचा आधार न घेता समर्पित आणि श्रद्धायुक्त भावनेने आयुर्वेदाचे अनुसरण करुन लोकांना दिलासा द्या असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. आयुर्वेद व्यासपीठच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने आयुर्वेद पर्वाअंतर्गत नागपुरात आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी भारतीय चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, संस्थापक विनय वेलणकर, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रजनी गोखले, नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रसाद देशपांडे, संतोष नेवपुरकर, डॉ. आनंद टेंभूर्णीकर, राजेश गुरु, मल्हार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी, ज्ञान व अनुभवानंतर पदवी मिळते पण चिकित्सा क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा परिणाम दिसल्यावर सन्मान मिळतो, त्यामुळे अभ्यासादरम्यान मिळालेल्या ज्ञानातून नैतिकता राखत, योग्य औषधांचा वापर करुन लोकांना व्याधीमुक्त करणे हा त्याचा परिणाम आहे. तंत्रज्ञानामुळे आता नवी उपकरणे आली आहेत, त्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला देखील गडकरी यांनी दिला. दीपप्रज्वलन आणि निकिता नखाते यांच्या धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. नितीन गडकरी आणि डॉ. जयंत देवपुजारी यांना विठ्ठलाची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आयुर्वेद व्यासपीठाची भूमिका मांडताना विनय वेलणकर यांनी, कुणाचाही विरोध न करता, केवळ सेवा, शिक्षण आणि संशोधनावर आम्ही भर देऊन देशभरात आयुर्वेदाचे स्थान निर्माण केल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून डॉ. रजनी गोखले यांनी चर्चासत्रात ९ राज्यातून ३ हजार प्रतिनिधी सहभागी झाले आणि त्यात महिलांचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले. यानंतर आयुर्वेद व्यासपीठचा युवा अभ्यासक वैद्य हा नव्याने सुरू केलेला पहिला पुरस्कार सोलापूरच्या मानसी कुळकर्णी यांना प्रदान करण्यात आला. या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित शोध प्रबंध, शिक्षक-प्रशिक्षक, पोस्टर स्पर्धा, प्रॅक्टीशनर आदी गटात प्रत्येक तीन पुरस्कार देऊन सर्व वयोगटातील वैद्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात जतिराम सहारे,अंकिता जगताप, सर्वेश मराठे, तन्मयी परांडे, अशोक नवारे, मेघश्याम अंदनकर, सुमंत पांडे यांच्यासह मोठ्या संख्येत वैद्यांचा अंतर्भाव होता. यावेळी प्रकृती परीक्षण अहवाल देखील सादर करण्यात आला. आभारप्रदर्शन प्रल्हाद जोशी यांनी केले. याठिकाणी लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.(दि.13 नोव्हेंबर 2022)